जळगाव एसीबीची भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – चेक बाऊन्स प्रकरणात अटक टाळण्यासाठी आणि वॉरंट रद्द करण्यासाठी मुदतवाढ देण्याकरिता ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या २ सहाय्यक फौजदारांसह एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली. या कारवाईत लाचेची मागणी करणारे बाळकृष्ण मुकुंदा पाटील आणि आत्माराम सुधाम भालेराव या २ पोलीस उपनिरीक्षकांसह ठाणसिंग प्रतापसिंग जेठवे या खाजगी इसमाला अटक करण्यात आली आहे.
एका ४७ वर्षीय व्यक्तीविरुद्ध खामगाव न्यायालयात चेक बाऊन्स प्रकरणी (कलम १३८) खटला दाखल आहे. या प्रकरणात न्यायालयाने तक्रारदाराविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट रद्द करण्यासाठी मुदतवाढ देण्याकरिता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या सहायक फौजदार बाळकृष्ण पाटील आणि आत्माराम भालेराव यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली.(केसीएन)याबाबत तक्रारदाराने २१ ऑगस्ट रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, दोन्ही पोलीस फौजदारांनी पंचांसमक्ष २ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर आज सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले. या सापळ्यात, आरोपी क्रमांक १ बाळकृष्ण पाटील यांच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक ३ ठाणसिंग जेठवे याने लाचेची रक्कम स्वीकारली. (केसीएन)या घटनेनंतर तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील (चालक), तसेच पोलीस हवालदार किशोर महाजन, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, भूषण पाटील आणि प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.