जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील वाहतूक कोंडी आणि अनधिकृत अतिक्रमवणांवर नियंत्रण आणण्यासाठी जळगाव महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक गुरुवारी सकाळपासूनच अॅक्शन मोडमध्ये दिसून आले. सकाळी नेमके आठ वाजता पथकाने शहरातील प्रमुख व्यापारी भागांवर धडक कारवाई सुरू केली आणि अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडली. या कारवाईदरम्यान १९ हातगाड्या, ३ लोखंडी पेट्या आणि ४ प्लाय साहित्य जप्त करण्यात आले, तसेच १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अतिक्रमणांवर थेट प्रहार करण्याच्या उद्देशाने पथकाने सर्वप्रथम फुले मार्केट परिसर गाठला. येथे हॉकर्सनी उभारलेल्या लोखंडी पेट्या आणि अवजड साहित्य तात्काळ हटवण्यात आले. त्यानंतर मोर्चा जुने बसस्थानक परिसराकडे वळवण्यात आला आणि तेथील हातगाड्या जप्त करण्यात आल्या.
दरम्यान, मनपाच्या या धडक कारवाईमुळे दाणाबाजार आणि सुभाष चौक परिसरातही चांगलीच धावपळ उडाली. फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त करण्यात येत असल्याने काही ठिकाणी विक्रेत्यांमध्ये वाद निर्माण झाले. मात्र मनपाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तासह कारवाई पुढे सुरू ठेवत शिस्तबद्धपणे अतिक्रमण हटविले.









