घराण्याची चांगली कीर्ती पसरविणारा, उत्तम गुण असलेला, आई-वडिलांची कदर करणारा, जाण ठेवणारा त्यांच्या प्रती कृतज्ञता जपणारा, पित्याची जितकी कीर्ती त्याहून त्याची जास्त कीर्ती असणारा कीर्तिवान असावा. असे गुणवैशिष्ट्ये असलेला पुत्र हा अतिजात पुत्र असे म्हटले जाते. अतिजात पुत्र, अनुजात, अवजात आणि कुलंगार असे आगम शास्त्रात पुत्रांचे चार प्रकार सांगण्यात आलेले आहेत. त्याबाबत सोदाहरण विवेचन परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनातून केले.
कुलंगार पुत्राच्या प्रकारात तो पुत्र अवगुणी, व्यसनी आणि कुलाची कीर्ती धुळीला मिळविणारा असतो. असा पुत्र जन्माला येणे आई वडिलांसाठी मोठे खेदाचे असते. रेमंड उद्योग समुहाचे संस्थापक सिंघानिया पिता- पुत्राचे उदाहरण त्यांनी दिले. कुपुत्र होऊ शकतो परंतु कुमाता झालेली आतापर्यंत कुठेच ऐकण्यात आलेले नाही. अनुजात व अवजात या पुत्र प्रकारांबाबतची वैशिष्ट्ये देखील परमपुज्य महाराज साहेब यांनी सांगितली. प्रभु रामचंद्रांचे उदाहरण देखील त्यांनी प्रवचनात दिले. अयोध्येचे राजे दशरथ यांचे पुत्र राम आणि लक्ष्मण यांचे उदाहरण घेतले तर राजा दशरथ यांच्यापेक्षाही राम आणि लक्ष्मण यांची कीर्ति अधिक आहे. हे अतिजात पुत्राचे लक्षण होय. अनेक गुणांनीयुक्त अतिजात पुत्र जन्माला यावा व आई वडिलांनी त्याला संस्कार करावे असे आवाहन ही करण्यात आले. यावेळी परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांचेही प्रवचन झाले. व्यक्तीने एकात्म भावना वाढीचा पुरुषार्थ करायला हवा. आपली स्वतःची स्वतःशी भेट घडावी यासाठी स्थानक अथवा पवित्र स्थळी थोडा वेळ बसावे असे आवाहन देखील महाराज साहेबांनी केले.
स्वाध्याय भवन, जळगाव
_शब्दांकन – किशोर कुळकर्णी, प्रसिद्धी विभाग जैन इरिगेशन. जळगाव_