आ. राजूमामा भोळे यांच्यातर्फे भोजन, निवासाची तात्पुरती व्यवस्था
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील खेडी शिवारातील डॉ. आंबेडकर नगरात असलेल्या एका भागात घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने नजीकची ४ पार्टेशनची घरे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. या आगीत ४ कुटुंबांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाली असून संसार उघड्यावर आला आहे. रस्त्यावरील गल्लीत अंधार आणि रस्ते कमी रुंदीचे असल्याकारणामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. तरीदेखील महानगरपालिकेच्या दोन अग्निशमन बंबाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली आहे. दरम्यान, आ. राजूमामा भोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन आगग्रस्तांच्या निवास व भोजनाचीव्यवस्था कार्यकर्त्यांमार्फत करून दिली आहे.
कार्तिक एकादशीच्या निमित्ताने जळगाव शहरात श्रीराम रथोत्सव असल्याने रथोत्सव पाहण्यासाठी खेडी शिवारातील डॉ. आंबेडकर नगरातील जवळजवळ राहणारे चारही कुटुंब हे रथोत्सव पाहण्यासाठी मंगळवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता गेलेले होते. दरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एका पार्टेशनच्या घरात अचानक आग लागली. या आगीमुळे घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. बघता बघता एकापाठोपाठ असे चारही पार्टेशनच्या घरांना भीषण आग लागली. दरम्यान आग लागल्यानंतर काही नागरिकांनी व तरुणांनी शेजारी राहणाऱ्या काहींच्या घरातील गॅस सिलेंडर उचलून थेट नाल्यात फेकून देण्यात मदत केली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु यावेळी रस्ते अरुंद आणि अंधार असल्या कारणामुळे वाहन जाण्यास मोठी अडचण झाली. शेवटी तरुण व नागरिकांच्या मदतीने ही आग विझवण्यास मदत झाली. तोपर्यंत चारही घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहेत. चारही घरांना आग लागल्यानंतर या घटनेची माहिती मिळताच आ. राजूमामा भोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच चारही कुटुंबांला धीर दिला. चारही कुटुंबांची तात्पुरती राहण्याची व जेवणाची व्यवस्था कार्यकर्ते उज्ज्वल पाटील यांच्यामार्फत आ. राजूमामा भोळे यांच्या वतीने खेडी येथील शाळेत करण्यात आली आहे. दरम्यान, घटनेत कोणी जखमी झाल्याबाबत माहिती मिळू शकली नाही.