जळगाव तालुक्यातील असोदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव-आसोदा रोडवरील एका वीटभट्टीजवळ आज रविवारी सकाळी अडीच ते तीन महिन्यांचे एक मृत बाळ अत्यंत विद्रूप अवस्थेत आढळून आले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक पुंडलिक कुंभार (वय ४३, रा. हनुमान नगर, रामेश्वर कॉलनी, मेहरून, जळगाव) हे आसोदा शिवारात, संजू हरी ढाके यांच्या शेतात वीटभट्टी व्यवसाय चालवतात.(केसीएन)आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास कुंभार हे आपल्या वीटभट्टीवर विटा घेण्यासाठी गेले असता, त्यांना एका लहान बाळाचा मृतदेह दिसला. हे बाळ अंदाजे अडीच ते तीन महिन्यांचे असून, त्याचा चेहरा कुजलेला, डोळे बाहेर आलेले आणि डावा पाय गुडघ्यापासून तुटलेला होता. अंगावर एक रुमाल टाकलेला होता.
ही घटना पाहताच अशोक कुंभार यांनी तात्काळ आसोदा गावातील बाळू रामकृष्ण पाटील आणि पोलीस पाटील आनंदा सीताराम बिऱ्हाडे यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून मृत अर्भकाला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.(केसीएन)अशोक कुंभार यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात आरोपीने या लहान बाळाला जन्मानंतर गुप्तपणे या ठिकाणी टाकून दिले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव तालुका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे.