दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे सन्मानित
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा येथील मूळचे रहिवासी असलेले लेफटनंट जनरल जगदीश बळीराम चौधरी यांना शुक्रवारी दिनांक 19 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करून गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे हा शाही सोहळा पार पडला. यामुळे जळगाव जिल्ह्याचे नाव आणखी उंचावले आहे.
लष्करातील अत्युच्च दर्जाच्या सेवेसाठी ३१ जणांना परम विशिष्ट सेवा पदक, ४ उत्तम युद्ध सेवा पदक, ५७ अतिविशष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. (केएसएन)परम विशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आलेले लेफटनंट जनरल जगदीश बळीराम चौधरी हे ब्रिगेड ऑफ दि गार्डस या भारतीय सेनादलाच्या इन्फ्रंट्री रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत. लष्करात अत्युच्च दर्जाच्या सेवेसाठी १९६० पासून हा सन्मान देण्यात येत आहे.
जगदीश चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण आसोद्यात झाले तर पुढील शिक्षण त्यांनी सातारा सैनिक स्कूल व एनडीएमध्ये घेतले आहे. १९८७ पासून ते सैन्यदलात सेवारत आहेत. त्यांनी कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर या महत्त्वाच्या पदांवर यशस्वीरित्या कार्य केले आहे.(केएसएन) विविध पदांवर काम करताना आपल्या सेवेतून विशेष ओळख निर्माण केली आहे. १९८९मध्ये त्यांनी केलेल्या युद्ध क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीकरिता सेना पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.