धुळ्याच्या तरुणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी):- अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धुळे येथील एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पीडित १८ वर्षीय तरुणी जळगाव शहरातील रहिवासी आहे. नोव्हेंबर २०२४ पासून ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपी हुजेफ युनुस पिंजारी (वय १९, रा. चाळीसगाव रोड, धुळे) याने पीडितेशी संपर्क ठेवला होता. जळगाव शहरातील एका क्लासमधील बाथरूममध्ये आणि एका हॉटेलच्या रूममध्ये पीडितेचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी त्याने वारंवार दिली.
आरोपीने पीडितेला फोनवरून सतत मानसिक त्रास दिला. “तू तुझे नग्न फोटो मला पाठवले नाहीस, तर तुझे जुने अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन,” अशी धमकी देत त्याने पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पीडितेच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसांनी आरोपी हुजेफ पिंजारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.









