जळगाव (प्रतिनिधी) – शहरात टोळीतील वर्चस्वाच्या वादातून आणि कथित कुंटणखान्याची टीप दिल्यावरून झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, गोळीबार करून पसार झालेल्या दोन मुख्य संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शहरातील कांचननगरात झालेल्या एका पार्टीत ‘लाडू गँग’च्या सदस्यांमध्ये वर्चस्वावरून आणि कुंटणखान्याची माहिती पोलिसांना दिल्यावरून तीव्र वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर तडीपार असलेला संशयित आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (वय २५) याने गोळीबार केला.
या गोळीबारात गँगमधीलच आकाश उर्फ टपऱ्या बाविस्कर याच्या छातीला आणि गणेश उर्फ काल्या सोनवणे याच्या हाताला गोळी लागून दोघे जखमी झाले. जखमी आकाश उर्फ टपऱ्या बाविस्कर याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आकाश उर्फ डोया सपकाळेसह गणेश उर्फ काल्या सोनवणे, विक्की चौधरी, सागर सुधाकर पाटील, तुषार उर्फ साबू सोनवणे व करण पाटील (वय २५) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळीबारानंतर मुख्य संशयित आकाश उर्फ डोया सपकाळे आणि करण पाटील हे दोघे पसार झाले होते. पोलीस त्यांच्या मागावर असताना ते शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये लपून बसले होते. जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना हे दोघे संशयित डीमार्ट परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी डीमार्ट परिसरातून दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर संशयितांना शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी आज बुधवारी आकाश सपकाळे आणि करण पाटील या दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना ही दिनांक १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.









