पाचोरा शहरात राजीव गांधी कॉलनीतील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील बहिणीच्या घरात आलेल्या १९ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज दुपारी बारावीचा निकाल लागला. निकालात त्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असे मित्रानी सांगितले.
भावेश प्रकाश महाजन (वय १९, रा. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे. भावेश हा एरंडोल येथे महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. भावेश याने एरंडोल येथे नुकतीच बारावी इयत्तेची परिक्षा दिली होती. परीक्षा झाल्यावर भावेश हा गेल्या १५ दिवसांपासून पाचोरा येथील भडगाव रोड वरील राजीव गांधी काॅलनी (शक्तीधाम जवळ) राहत असलेल्या बहिणीकडे आला होता.(केसीएन) दि.४ मे रोजी सायंकाळी भावेश याची बहिण व पाहुणे हे पुणे येथे लग्न समारंभासाठी गेले होते. भावेश हा दि. ५ मे रोजी सकाळी १० वाजता पाचोरा शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील दुसऱ्या पाहुण्यांच्या दुकानावर गेला होता.
दरम्यान दुपारी १२ वाजता भावेश हा दुकान बंद करुन राजीव गांधी काॅलनी येथील बहिणीच्या घरी गेला. दुपारी १ वाजता १२ वी चा आॅनलाईन निकाल जाहिर झाला. यात भावेश यास ४२ टक्के गुण मिळाले. भावेश याने नैराश्यातून बहिणीच्या राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. दुसरीकडे शहरातच वास्तव्यास असलेल्या दुसऱ्या बहिणीकडुन भावेश यास जेवणाचा डब्बा येत होता.(केसीएन)डब्ब्यासाठी बहिण भावेश यास फोन करीत होती. मात्र भावेश फोन उचलत नव्हता. अखेर पाहुण्यांनी शेजारी राहणाऱ्या मित्राला घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले असता भावेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.