पाचोरा तालुक्यात सीईओ करनवाल यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा भरातील विविध आस्थापनांना भेटी देण्याचा धडाका सुरू केला आहे. बुधवार दि.१६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीना भेट दिली असता प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आलेल्या अस्वच्छताप्रकरणी तेथील सफाई कामगाराचे एका दिवसाचे वेतन रोखण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या अधीनस्त आस्थापनाना भेटी देण्याचा धडाका सुरू केला आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा,ग्रामपंचायती तसेच ग्रामीण भागात सुरू असलेल्या घरकूल बांधकामाना भेटी देऊन पाहणी करण्यात येत आहे. मंगळवार दि.१५ रोजी भुसावळ तालुक्यातील साकरी आणि किन्ही येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली होती.तर बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी पाचोरा तालुक्यातील वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन तेथील औषध साठा,रुग्णांवर करण्यात येत असलेले उपचार,तेथील स्वच्छता याबाबत पाहणी केली.
वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात अस्वच्छता आढळून आल्याने तेथील सफाई कामगार यांना जाब विचारत सफाई कामगार यांचे एक दिवसाचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले. या सोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पिंपळगाव हरेश्वर येथे सुरू असलेल्या घरकुल बांधकामे या सोबतच ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन पाहणी केली.त्या सोबतच शिंदाड येथे देखील ग्रामपंचायत कार्यालय व बांधकामे सुरु असलेल्या घरकुलाना भेट देऊन कामाची पाहणी केली व बांधकामाचे काम दर्जेदार करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस.लोखंडे उपस्थित होते.