औरंगाबाद ( वृत्तसंस्था ) – औरंगाबाद शहरात आज बड्या उद्योजकांविरोधात ईडीने एकापाठोपाठ एक असे छापे टाकले आहेत. आतापर्यंत नेमक्या कोणत्या उद्योजकांवर ही कारवाई सुरु आहे, हे गोपनीय होते.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादचे बडे व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्यावर ईडीची रेड पडल्याचा खुलासा झाला आहे. तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे आल्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा जोर धरत आहे.
या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील बियाणे उत्पादक व्यावसायिकावर ही धाड पडली आहे. बियाणे उत्पादक व्यावसायिक पद्माकर मुळे असे त्यांचे नाव असून ते शहरातले सरकारी ठेकेदार आहेत. पद्माकर मुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार कुटुंबियांशी अगदी घनिष्ठ संबंध आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी मधुकर अण्णा मुळे यांचे हे बंधू आहेत. औरंगाबादमध्ये अजित सीड्स नावाने पद्माकर मुळे यांची कंपनी आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे विश्वस्थ असून त्यांच्या नावावर साखर कारखानादेखील आहे.
वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई, पुणे, औरंगाबादसह सात ठिकाणी ईडीने या धाडी टाकल्या आहेत. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. वक्फ बोर्ड हा विभाग सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येतो. वक्फ बोर्डाच्या जमिनी भाडेतत्त्वावर देता येतात मात्र त्याची विक्री करता येत नाही. मात्र औरंगाबादमधील काही उद्योगपतींनी त्या इमारती भाडेतत्त्वार घेऊन त्यावर टोलेजंग इमारतीही बांधल्या आहेत. त्या इमारतीतील गाळे थेट रजिस्ट्री, खरेदीखत करून विकल्यादेखील आहेत. हा गैर व्यवहार शेकडो कोटींचा झाला होता. यासंदर्भातील तक्रारी ईडीकडे दाखल झाल्या होत्या. याविरोधात ईडीने तपाससत्र सुरु होतं. त्यानुसार औरंगाबादमध्येही ही धाड पडली आहे.