आ.गिरीश महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांचे मदतकार्य सुरू
जामनेर (प्रतिनिधी) – ट्रकने दिलेल्या धडकेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर घटनेत ४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी जामनेर तालुक्याचे आ. गिरीश महाजन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी मदत सुरू केली आहे.
जामनेर ते गारखेडा दरम्यान हा अपघात झाला आहे. लाकडाने भरलेला एम.एच.- २१.६०४५ आयेशर व प्रवासी घेऊन जात असलेली पॅजो – रिक्षा एम. एच.- १९ ए.ई. ९१५८ यांच्यामध्ये ही धडक झाली आहे. या धडकेत पॅजो रिक्षातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जी.एम. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या रुग्णालयात तसेच जळगावच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघातप्रकरणी पोलीस माहिती घेण्याचे काम करीत असून घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, जखमींची प्रकृती लवकर बरी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया आ. गिरीश महाजन यांनी दिली. दरम्यान यातील जखमी कु-हे पानाचे ता. भुसावळ येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. एसटी बस बंद असल्यामुळे प्रवाशांना पॅजो रिक्षातून प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास जीवघेणा ठरत आहे.