घटना सीसीटीव्हीत कैद
मुंबई (वृत्तसेवा) : मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री एका बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या बेस्ट बसने भरधाव वेगात अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, ४९ जण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सोमवारी रात्री साडे नऊ वाजता एस.जी. बर्वे मार्गावर बेस्टची ३३२ क्रमांकाची बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली. बसने समोर असलेल्या वाहनांना १०० मीटर फरफटत नेले. या घटनेत दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. बस अखेर एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या भिंतीला आणि पोलला धडकून थांबली. अपघातात तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला. जखमींपैकी २५ जणांना भाभा आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाभा रुग्णालयातील डॉक्टर पद्मश्री अहिरे यांनी दोन जणांचा मृत्यू आधीच झाल्याचे सांगितले, तर उर्वरित जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासानुसार, बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बस चालकाला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना आपत्कालीन खिडकी फोडून बाहेर काढण्यात आले. स्थानिकांनीही जखमींना रुग्णालयात हलविण्यास मदत केली. मात्र, बस चालकाला काही नागरिकांकडून मारहाण होण्याचा धोका होता, पण काहींनी त्याला सुरक्षित स्थळी नेले. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात बसने वाहनांना फरफटत नेण्याचे आणि नागरिकांनी बसचा पाठलाग करताना दिसण्याचे दृश्य आहे. कुर्ल्यातील या भीषण अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली असून, सदर घटनेची चौकशी सुरू आहे.