जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कानळदा रोड जवळच्या राजाराम नगराजवळ एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीवरील महिला व पुरुष हे रस्त्याच्या कडेला असलेल्या कोरड्या गटारीत फेकले गेले. यावेळी जखमींना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेनेचे कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांनी तातडीने त्यांच्या स्वतःच्या वाहनात जखमींना टाकून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामुळे जखमींना तातडीने उपचार मिळाले.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेनेचे कार्यकर्ते लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर हे एका कार्यक्रमातून जळगावला येत होते. त्यावेळेला त्यांना कानळदा रस्त्यावरील राजाराम नगराजवळ अपघात झालेला दिसून आला. त्यांनी तातडीने त्यांची कार थांबवली. दुचाकीचा अपघात झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी बघितले तर एका कोरड्या गटारीत दोघेही जखमी पडलेले होते. त्यांनी तातडीने कार्यकर्त्यांच्या मदतीने महिला व पुरुषाला बाहेर काढून त्यांच्या कारमध्ये बसविले.
त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दोघांना दाखल केले. लक्ष्मण पाटील यांची समयसूचकता पाहता दोघेही जखमींचे प्राण वाचून त्यांना तातडीने उपचार मिळाले. याबद्दल लक्ष्मण पाटील यांचे कौतुक केले जात आहे.