राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका नगर जवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील धुळे रोडवर द्वारका नगर रस्त्यावरती भरधाव आयशर वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत पिता-पुत्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहरातील बीबा नगरात दीपक सोनवणे हे परिवारासह वास्तव्यास आहेत. गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी ते रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी (एमएच १९ डीयू १४४७) ने त्यांचा पाच वर्षांचा मुलगा लोकेश सोनवणे याला घेऊन पावभाजी घ्यायला गेले होते. ते घेऊन परतत असताना रस्ता ओलांडताना पाळधीकडून जळगावकडे जाणाऱ्या (एमएच ३१ एफसी ४७४५) क्रमांकाच्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार दीपक सोनवणे, त्यांच्या मुलगा लोकेश हे दोघ गंभीर जखमी झाले. दरम्यान, महामार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांनी जखमी पितापुत्राला तात्काळ वाहनातून खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनेचा प्राथमिक तपास सुधाकर शिंदे, अनिल फेगडे हे करीत आहेत