पाचोरा तालुक्यातील दुसखेडा परिसरातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील
दुसखेडाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना रविवारी २४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी भीषण अपघात झाला आहे. रुळावरून मालगाडी येत असल्याचे दूरवरून दिसत असतानाही काही नागरिकांनी रूळ ओलांडण्याची चूक केली. यावेळी मालगाडीच्या धडकेत दोन जण ठार झाले असून एक ते दोन जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मयत दोघांमध्ये एक महिला, एक पुरुष यांचा समावेश आहे. याप्रमाणे पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
पाचोरा जवळील दुसखेडा गावातील बहुळा नदीच्या पुलाजवळ थोड्याच पुढे अंतरावर काही महिला व पुरुष हे रेल्वे रुळ ओलांडत होते. त्यावेळी मालगाडीच्या भीषण धडकेत एक महिला व एक पुरुष ठार झाले. यात दुसखेडा येथील महिला रत्नाबाई माधव पाटील (वय५९) आणी पहाण येथील रहिवासी अशोक झेंडू पाटील(वय ६०) या दोन्हीचा मृत्यू झाला आहे. अशोक पाटील हे कुरंगी शिवारातील शेती करण्यासाठी सध्या दोन वर्षांपासून दुसखेडा येथे रहात होते.
काही महिला व पुरुष हे परधाडे येथे हरीनाम सप्ताहास दुसखेडा येथून जात होते. दुसखेडा या गावाजवळ रेल्वे क्रॉसिंग करत असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या रेल्वेखाली आल्याने अपघात झाल्याची घटना घडल्याची प्रथमदर्शनी माहिती दिली आहे. सदर घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेतली असता मदत कार्य सुरू करण्यात आले होते. पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.