जळगाव शहरातीलघटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महानगरपालिकेच्या इमारतीसमोर संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराचे वाहन दुभाजकाला धडकले. या अपघातात तो जागीच मरण पावला असून शहर पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
मिलिंद सोमनाथ पवार (वय ४५, रा. शाहूनगर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो जे.के. पान मंदिर, जळगाव या ठिकाणी कामाला आहे. संध्याकाळी तो टॉवर चौकाकडून कामाच्या ठिकाणी चालला होता. त्यावेळेला महानगरपालिकेच्या इमारतीसमोर असलेल्या विजेच्या डीपीजवळ त्यांच्या अपघात झाला.
दुभाजकाला धडकून ते जोरात खाली आपटले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. दरम्यान कुटुंबीयांना घटनेची माहिती कळताच त्यांनी रुग्णालयामध्ये एकच आक्रोश केला आहे.
मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडल्यामुळे काही काळ नागरिक देखील स्तब्ध झाले होते. मयत मिलिंद पवार यांचे पश्चात आई, वडील भाऊ, पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.