वरणगाव महामार्गावरील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत पती ठार झाला असून पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी ५ मे रोजी सकाळी घडली आहे. वरणगाव पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
भुसावळ येथील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक ललित प्रभाकर नेमाडे हे त्यांच्या पत्नी नीता यांचेसह आज पौर्णिमा असल्याने हरताळा येथील देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान वरणगाव बायपास वरून जाणाऱ्या महामार्गावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात ललित प्रभाकर नेमाडे ( वय ४८, रा. भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी या गंभीर जखमी झाल्या आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या संदर्भात वरणगाव पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली.