मृत व्यक्तींमध्ये पाचोऱ्याच्या दोघांचा समावेश
मलकापूर (प्रतिनिधी) : – भरघाव आयशर -ट्रकच्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याच्या दोघांसह तीन जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी दि. ८ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता उघड झाली आहे. एक जण गंभीर जखमी झाला. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर तालसवाडा फाट्यानजीक ही घटना घडली. पोलीस घटनेची माहिती घेत असून घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
आयशर क्र.(एम.एच.१९/सी.एक्स. ०९७७) हि पाचोर्याची गाडी भुसावळ वरून अकोल्याकडे निघाली होती. राष्ट्रीय महामार्गावर तालसवाडा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने भरघाव आलेल्या ट्रक (क्र.एम.पी.१४/एच.सी.३७८६) या वाहनाची समोरासमोर भीषण धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागांचा अक्षरशः चुराडा झाला. आयशर वाहक सचिन ज्ञानेश्वर पिलोरे (३२ रा.पतखडी (बेलदार वाडी ता. पाचोरा) व ट्रकचालक रघुवीर सिंह (३९ पाटणीया, मध्यप्रदेश) हे दोघे जागीच ठार झाले. तर अपघाती वाहनांमध्ये अडकलेल्या दोघांना क्रेनने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
रुग्णालयात गंभीर जखमींवर शर्थीचे उपचार करण्यात आले. मात्र दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुलढाणा व जळगाव खान्देश हलविण्यात आले. त्यापैकी समाधान यमराज पवार (३८ रा.लोहारा ता. पाचोरा) यांचा बुलढाणा नेत असतांना दाताळा नजीक मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी रामलाल मिना (४८ रा.पाटलीया) मध्यप्रदेश याला जळगावला हलविण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील तालसवाडा नजीक नळगंगा नदीतिरावरील नविन पुलाला भगदाड पडल्याने त्याला ठिगळ लावण्याचे काम कासवगतीने गत काही दिवसांपासून सुरू होते. त्यामुळे तालसवाडा ते दसरखेड दरम्यान वाहतूक एकतर्फी करण्यात आली आहे. मात्र तालसवाडा नजीक एकेरी वाहतूक संदर्भात फलक नसल्याने हा अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले.
संबंधित ठेकेदारच या अपघातास कारणीभूत असुन त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी ॲड हरीश रावळ, शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी केली आहे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांची एकच गर्दी झाली. महामार्ग पोलिस व एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल दोन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.