जळगाव शासकीय रुग्णालयात सुरू होते उपचार
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रामदेववाडी जवळ मंगळवारी दि. ७ मे रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातातील चौथ्या जखमी तरुणाचा मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.
तालुक्यातील रामदेववाडी जवळ पठारवाडी परिसरात आशा सेविका राणी उर्फ वत्सलाबाई सरदार चव्हाण (वय ३०) यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली होती. या धडकेत राणी चव्हाण यांच्यासह त्यांची मुले सोमेश सरदार चव्हाण (वय २), सोहन सरदार चव्हाण (वय ७) यांचा मृत्यू झाला होता. तर सोबत असलेला नणंदेचा मुलगा लक्ष्मण पदमसिंग नाईक (वय १६) हा गंभीर जखमी झाला होता.
त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर मध्यरात्री १२ वाजता उपचारादरम्यान लक्ष्मण नाईक याचा मृत्यू झाला आहे. याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी टाहो फोडला. दरम्यान, या भीषण अपघाताप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.