जळगाव शहराजवळची ममुराबाद रोडवरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरानजीक ममुराबाद रोडवर मावसभावासह चारा घ्यायला गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला होता.
रोहन कैलास पाटील (वय १३, रा. चिंचोली ता. जळगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. तो चिंचोलीत आई, वडील, बहिणीसह राहत होता. रोहनचे वडील सेंट्रिंग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शुक्रवारी दि. ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रोहन हा मावसभाऊ अक्षय संदीप इखे याच्यासह ममुराबाद येथे दुचाकीने चारा घ्यायला गेला होता. तेथून परतत असताना जळगाव शहरानजीक ममुराबाद रोडवर भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले.
आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेव्हा वैद्यकीय अधिकारी यांनी रोहन पाटील यास तपासून मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.