पारोळा तालुक्यातील म्हसवे फाट्याजवळील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोण गावाकडे जाणाऱ्या वळणावर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या कारला जोरदार झालेल्या भीषण अपघातात कारमधील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सुधीर देवीदास पाटील (वय-४८) आणि त्यांची पत्नी ज्योती सुधीर पाटील (वय ४४, दोन्ही रा. लोणी ता. पारोळा ह.मु. गुजरात राज्य) असे मयत झालेल्या दाम्पत्याची नावे आहे. लोणी गावातील रहिवाशी असलेले सुधीर पाटील हे पत्नी ज्योती पाटील यांच्यासह गुजरात राज्यात वास्तव्याला होते. दरम्यान, लोणी गावातील नातेवाईकांचे ४ डिसेंबर रोजी लग्न असल्याने पाटील दाम्पत्य हे मुळ गावी जाण्यासाठी गुजरात राज्यातून आलेले होते. सोमवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील म्हसवे गावातील फाट्याजवळ सुधीर पाटील हे कार क्रमांक (जीजे ०५ आरएच १२४७) ने लोणी गावी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना पाटील हे कार वळवत होते.
त्यावेळी जळगावकडून धुळेकडे जाणारी भरधाव वेगाने जाणारी ऑडी कार क्रमांक (डीडी ०३ के ६९०३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत गुजरात येथून कारमध्ये आलेले पाटील दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, गुजरात पासींग असलेली कारचा पुर्णपणे चुराडा झाला आहे. तर ऑडी कारमधील जखमींना तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरीकांनी एरंडोल ते धुळे दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाला लागून समांतर रस्ता करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.