चोपडा तालुक्यातील शिरपूर रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : निवडणूक कामाची ड्युटी आटोपून शिरपूर तालुक्यातील गावी जात असलेल्या एका शिक्षकाचा चोपडा-शिरपूर रस्त्यावर गलंगी चौकात दुचाकी अपघातामध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दि. २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (वय ४९ रा. बभळाज ता. शिरपूर) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. ते चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. परिवारासह ते गावात राहत होते.(केसीएन)दरम्यान त्यांची निवडणुकीनिमित्त शासनाने ड्युटी लावली होती. मतदान कर्तव्यावर असताना व काम आटोपून घरी बभळाज गावी रात्री परत जात असताना संध्याकाळी ७ वाजेनंतर हातेड गलंगी दरम्यान व चोपडा शिरपूर रस्त्यावर गलंगी चौकात त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.
त्यांना नागरिकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.(केसीएन) दरम्यान घटनेबद्दल चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे लक्ष्मीकांत पाटील यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.