दोन चिमुकल्यांसह चार जण जबर जखमी
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथून जळगावकडे बहिणीला घेऊन येत असलेल्या भावाच्या दुचाकीला देवकर महाविद्यालयाजवळ भीषण अपघात झाला. अचानक रस्त्यात बैल आडवा आल्याने दुचाकीवरील भाऊ-बहिण व बहिणीची मुलं रस्त्यावर फेकली गेली. यात चार जण जबर जखमी झाले. शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
शिरसोली येथील रहिवासी असलेल्या भारती राहुल गायकवाड (वय २३) या विवाहितेचा पतीसोबत कीरकोळ वाद झाला. याबाबत तिने माहेरी कळविले. माहेरच्या मंडळींनी तिच्या भावाला आकाश दिनेश जाधव (वय २१) याला तिला घेऊन येण्यासाठी बहिणीच्या घरी शिरसोली येथे पाठविले.
आकाश जाधव हा त्याची बहीण भारती गायकवाड व तिचे मुलं राज राहुल गायकवाड (वय ४ वर्ष) आणि आर्यन राहुल गायकवाड ( वय १ वर्ष) यांना घेऊन जळगावातील चंदू अण्णा नगर येथे येत होता. रस्त्यामध्ये गुलाबराव देवकर महाविद्यालयाजवळ दुचाकी आली असताना रस्त्यात अचानक बैल आडवा आला आणि दुचाकीला जबर धडक बसली.
या धडकेत दुचाकीवरील सर्व जण रस्त्यावर फेकले गेले.यात आकाश जाधव याच्या डाव्या हाताला व पायाला जबर मार लागला असून फॅक्चर झाले आहे. तर चिमुकले आर्यन व राज यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली आहे. बहीण भारती गायकवाड यांना देखील पायाला मार लागला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे प्रथमोपचार केल्यानंतर सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान अपघात झाल्याचे वृत्त कळताच नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.