जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आदेश, जळगाव तालुक्यात खळबळ
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली प्र. बो. च्या सरपंच उषा अर्जुन पवार यांच्या सरपंच पदाच्या निवडीविषयी आक्षेप घेणारी याचिका जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी सोमवारी ३० डिसेंबर रोजी निकाली काढली आहे. यातील उषा पवार यांनी जात वैधता प्रमाणपत्र हे बनावट आणल्याप्रकरणी त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे.
ग्रामपंचायत सदस्य नितीन अर्जुन बुंधे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. यात अभ्यासी अधिकारी, सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याविषयी तक्रार होती. उषा अर्जुन पवार या सरपंच म्हणून ५ मार्च २०२४ रोजी ईश्वरचिट्ठीने निवडून आल्या होत्या.(केसीएन)मात्र सरपंच निवड करीत असताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार नियमांचा भंग करण्यात आला. यावेळी जात वैधता प्रमाणपत्राची अधिकाऱ्यांनी तपासणी केली नाही. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही सरपंच निवड झाली असा आक्षेप नितीन बुंधे यांनी घेतला होता.
खोटे कागदपत्र सादर केल्याप्रकरणी सरपंच उषा पवार यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील तक्रार अर्जात होती. मात्र जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी सर्व बाजू ऐकून घेऊन याबाबत सोमवारी निकाल दिला. निकालामध्ये, सरपंच निवडणूक घेताना कुठल्याही नियमांचा भंग झालेला नाही, ही बाब स्पष्ट झालेली आहे. असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
तसेच जात वैधता प्रमाणपत्र हे कुठल्याही सरकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले नसल्यामुळे ते अवैध ठरवण्यात येत आहे असेही निष्कर्षात म्हटले आहे. तसेच याच कारणामुळे सरपंच उषा अर्जुन पवार यांना अनर्ह अर्थातच अपात्र घोषित करण्यात येत असल्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी निर्गमित केला आहे. दरम्यान या निकालामुळे शिरसोली गावामध्ये एकच खडबड उडाली आहे.