पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे आर्थिक विवंचनेतुन एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने शेत शिवारात गळफास लावून घेत जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी समोर आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द प्र. पा. येथील रहिवाशी पुरषोत्तम सदाशिव पाटील (वय ४५) यांच्या मालकीचे १ एकर शेत जमिन असुन त्याच १ एकर जमिनीवर कुटुंबियांचा उदरनिर्वाह ते करीत होते. पुरुरषोत्तम पाटील यांचे पश्चात् वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे व नापिकीमुळे पुरुषोत्तम पाटील हे आर्थिक विवंचनेत होते. दरम्यान ६ फेब्रुवारी रोजी पुरुषोत्तम पाटील हे शेतात गेले होते. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नसल्याने त्यांचा शोध सुरू झाला असता त्यांचे शेतात झाडाला पुरुषोत्तम पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
सदरचा प्रकार कुटुंबियांना कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. पुरुषोत्तम पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी पुरुषोत्तम पाटील यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल मनोहर पाटील हे करीत आहे.