फैजपूर उपविभागात गेल्या १४ महिन्यांपासून कार्यरत
जळगाव (प्रतिनिधी) : फैजपूर विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षिका अन्नपूर्णा सिंह यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे पदोन्नतीवर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी उशिरा काढले आहे.
सन २०२० च्या त्रिपुरा बॅचच्या आयपीएस अधिकारी अन्नपुर्णा सिंह यांची फैजपूर पोलिस उप विभागात सहायक पोलिस अधिक्षक तथा डीवायएसपीपदी नियुक्ती झाली होती. आयपीएस अन्नपुर्णा सिंह या कडक शिस्तीचा अवलंब करणा-या अधिकारी म्हटल्या जातात.(केजीएन)महाराष्ट्र २०१९ च्या आयएएस बॅचचे अंकित (जिल्हा परिषद, जळगाव सीईओ) यांच्यासोबत अन्नपुर्णा सिंह यांचा विवाह झाला आहे. त्यामुळे भारतीय पोलिस सेवा (कॅडर) नियम १९५४ चा नियम ५ च्या उप नियम (२) नुसार त्रिपुरा आणि महाराष्ट्र सरकारच्या सहमतीने अन्नपुर्णा सिंह यांना त्रिपुरा संवर्गातून महाराष्ट्र संवर्गात स्थानांतरीत करण्यात आले आहे.
दि.१५ डिसेंबर रोजी अन्नपूर्णा सिंह यांची चोपडा उप विभागासाठी नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले होते.त्यानुसार त्या १८ डिसेंबर २०२३ रोजी हजर देखील झाल्या होत्या. दरम्यान पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले होते. (केजीएन)त्यात अन्नपूर्णा सिंह यांची फैजपूर येथे २२ डिसेंबर २०२३ रोजी बदली करण्यात आली होती. गेल्या १४ महिन्यापासून त्या फैजपूर येथे डीवायएसपी पदाचा कार्यभार सांभाळत होत्या. आता राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी व्यंकटेश भट, उपसचिव यांच्या सहीने काही सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात अन्नपूर्णा सिंह यांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नतीवर नियुक्ती देण्यात आली आहे.