डॉ. प्रदीप जोशी, प्रा.डी.एस.कट्यारे, विश्वजीत चौधरी यांचा समावेश
जळगाव (प्रतिनिधी) : – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित ३ दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठक नुकतीच शहादा (जि. नंदुरबार) येथे पार पडली. या बैठकीत २०२५-२८ या तीनवर्षासाठी राज्य कार्यकारिणीची निवड प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडली. यात जळगाव जिल्ह्यातील ३ कार्यकर्त्यांची राज्याच्या कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून, हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येऊन सदिच्छा देण्यात आल्या आहेत.
राज्यात ऐतिहासिकपणे साडेतीन दशके संत-समाजसुधारकांचा विवेकी वारसा चालविणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा राज्याच्या विस्तारित बैठकीत शनिवारी दि. ३१ मे रोजी दुपारी करण्यात आली असून राज्याच्या अध्यक्षपदी लातूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे यांची तर राज्य कार्याध्यक्षपदी सांगली येथील संजय बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. यासह नव्या दमाचे ५ प्रधान सचिव आणि ७ राज्य सरचिटणीस आता पुढील तीन वर्षात प्रभावी नेतृत्व करणार आहेत. तर २७ जिल्ह्यातील ७२ जणांचा कार्यकारिणीत समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील २२ कार्यकर्त्यांसह राज्यभरातून या बैठकीला ४६० कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या नूतन कार्यकारिणीत जळगावचे प्रा. डिगंबर कट्यारे यांची वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य कार्यवाह म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड झाली असून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांचीही राज्याच्या मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाच्या राज्य कार्यवाहपदी फेरनिवड करण्यात आली आहे. तर जळगावचे विश्वजीत चौधरी यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन निवड सहमती समितीने चौधरी यांची राज्याच्या मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाच्या राज्य सहकार्यवाहपदी नियुक्ती केली आहे. तिघंही कार्यकर्त्यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्हाध्यक्ष नेमीवंत धांडे, जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, अशोक पवार आणि राजेंद्र बावस्कर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, तिन्ही प्रधान सचिव सुनील वाघमोडे, रविंद्र चौधरी, प्रा. दीपक मराठे यांच्यासह कार्यकर्ते, हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.
०००००००००००