मुंबई ( प्रतिनिधी ) – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरोधात ईडीने बुधवारी विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले . सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २१ एप्रिलला व ११ मे रोजी ईडीने देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने यादीतील बार मालकांशी बैठक आयोजित करून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये चार कोटी ७० लाख रुपये जमा केले होते. अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीत दोन हफ्त्यांमध्ये रक्कम दिली, असा दावा वाझेने केला होता.
देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. बार मालकांकडून घेतलेली चार कोटी ७० लाख रुपयांची रक्कम ही तीच असल्याचा ईडीला संशय असून देशमुख यांच्या मार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवाला मार्फत दिल्लीतील कंपनी व पुढे देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे.
यावेळी वाझेने ही रक्कम १ नंबरसाठी घेत असल्याचे सांगितल होते. हा १ नंबर म्हणजे देशमुख असल्याचा ईडीला संशय आहे. देशमुख व त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित चार कोटी २० लाखांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली होती.
ईडीने देशमुख व कुटुंबियांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नियंत्रण असलेल्या २७ कंपन्यांची ओळख पटवली आहे. या कंपन्यांमध्ये आपापसात पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ईडीने आतापर्यंत देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना २६ जूनला अटक केली होती. ते देशमुख यांचे सर्व व्यवहार पाहत असल्याचा संशय ईडीला आहे. १ नोव्हेंबरला देशमुख यांना अटक झाली होती.