जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा जवळ असलेल्या अनेर मध्यम प्रकल्पात २०९.९० मीटर इतका पाणीसाठा झाला असून, तो २८ टक्के इतका आहे. अनेर मध्यम प्रकल्पातून अनेर पात्रात सध्यास्थितीला १५० क्यूसेक्स इतका पाणीसाठा धरणाच्या दहा दरवाज्यातून वाहून जात आहे. सध्यास्थितीत १४.१९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे पाऊस सुरू असल्याने नदीपात्रातील प्रवाहाला वेग आलेला दिसून येत आहे. या धरणाची ९२.७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा साठविण्याची क्षमता आहे.
धरणाच्या परिसरात व नदीपात्रात आतापर्यंत १९५ मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. धरणाची पाण्याची उंची २१६.४० मीटर इतकी आहे. धरणाच्या पात्रात सातपुडा डोंगरात पाऊस झाल्यास पाणी वाहत येऊन जमा होत आहे. उर्वरित पाणी नदीच्या पात्रातून वाहून जात आहे. सध्याच्या परिस्थितीला डोंगरदऱ्यात बऱ्यापैकी पाऊस आहे. धरण सातपुडा पहाडाच्या पहिल्या रांगेत असल्याने पहाडात भरपूर पाऊस झाल्यास मोठ्या प्रमाणात पाणी धरणाच्या पात्रात येते. याशिवाय सातपुड्याच्या पहिल्या व दुसऱ्या रांगेत असलेल्या तोरी नदीमधील पाणीसुद्धा अनेरमध्येच येत असल्याने पाण्याची वाढ होत आहे.