जळगाव : मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थदशीला विसर्जन मार्गावर अवजड वाहनांसह एसटी बसेस्, हलके अशा सर्वच वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहे.
गणरायाला निरोप देण्यापूर्वी विसर्जन मार्ग ते विसर्जनस्थळापर्यंत काही अडथळे नको म्हणून पोलिस प्रशासनाच्यावतीने या मार्गाची पाहणी करण्यात आली. त्याठिकाणी रहदारीच्या विनियमनासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक मार्गामध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
जळगाव ते पाचोरा दरम्यान येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी बसेस, अवजड वाहने तसेच हलक्या व मध्यम वाहनांकरीत इच्छादेवी चौकी, डी मार्ट, मोहाडी रोड वाय पॉईंट, गायत्री नगर, गणेश घाट, सेंट टेरेसा स्कूल, मलंगशहा बाबा दर्गा अशी शिरसोली रस्त्यावरील वरील वाहतूक १७ रोजी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
जळगाव ते पाचोरा दरम्यान जाणाऱ्या कार व दुचाकींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार ही वाहने आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, महाबळ चौक, संत गाडगेबाबा चौक, राजे संभाजी चौक (मोहाडी रस्ता), गुरु पेट्रोलपंप, मलंगशहा बाबा दर्गामार्गे पाचोराकडे जातील. तर पाचोऱ्याकडून जळगावकडे येणाऱ्या कार व दुचाकी याच मार्गाने जळगावकडे येतील.
आसोदा- भादली ते जळगाव या मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या एस.टी. बसेस व इतर सर्व वाहने मंगळवारी (१७ सप्टेंबर) सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत मोहन टॉकीज, गजानन मालुसरे नगर, जुने जळगाव, लक्ष्मी नगर, कालिंका माता मंदिरमार्गे महामार्गावरुन अजिंठा चौक, आकाशवाणी चौक, नवीन बसस्थानक या मार्गाचा वापर करु शकतील.
पाचोराकडून जळगावकडे येणारी अवजड वाहने ही आवश्यकतेनुसार १७ सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत पाचोरा, वावडदाकडून नेरीमार्गे अजिंठा चौकातून जळगावात येतील.