जळगाव : – दरवाजाला दगड मारण्याविषयी जाब विचारल्याने दोन जणांनी आरोग्यसेवक प्रदीप अमराज अडकमोल (४६, रा. आनंद शांतीनगर, वाघनगर) यांच्या घरावर दगडफेक करीत खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच दुचाकीचेही नुकसान केले. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी रात्री आनंद शांतीनगरात घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले.
चोपडा तालुक्यातील धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक असलेले प्रदीप अडकमोल यांचे जळगावातील आनंद शांतीनगरात घर आहे. ९ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांच्या घराच्या दरवाजाला दगड मारल्याचा आवाज आल्याने अडकमोल दाम्पत्य बाहेर आले असता त्यांना दोन जणांनी अश्लील शिवीगाळ केली. त्यातील एकाने दुचाकीची तोडफोड करीत दगडफेक केल्याने कुलरचे नुकसान होण्यासह खिडकीच्या काचा फुटल्या. एवढ्यावरच न थांबता दुसऱ्याने पती-पत्नीच्या दिशेने चाकू दाखवत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेमुळे अडकमोल कुटुंबीय भयभीत झाले. त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली असता तालुका पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी सागर हिमलेश दोहरे (१९) व तुषार गोविंदा जाधव (२०) दोन्ही रा. कोल्हे हिल्स जवळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून एक चाकू हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी अडकमोल यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहेत.