रोटरी क्लबतर्फे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान
जळगाव (प्रतिनिधी) : दुःखाच्या विणकामाशिवाय सुखी माणसाचा सदरा अशक्य आहे. त्यासाठी उपभोग, प्राप्ती आणि मालकी याचा विस्तार करून गांधीजींच्या तत्त्वाप्रमाणे विश्वस्ताची भूमिका आपल्याला करावी लागेल तरच ते शक्य आहे, असे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व वक्ते डॉ. आनंद नाडकर्णी (ठाणे) यांनी प्रतिपादन केले.
रोटरी क्लब जळगावच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गंधे सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्रा.डॉ.सीमा जोशी आणि प्रा.डॉ.शमा सुबोध यांनी डॉ. नाडकर्णी यांच्या समवेत संवाद साधला. अध्यक्ष ॲड.सागर चित्रे व माजी सचिव ॲड. हेमंत भंगाळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ. नाडकर्णी यांनी सुखाची व्याख्या स्पष्ट करताना मानवाच्या उत्क्रांतीपासून सुखद व दुःखद भावना असल्याचे सांगून संस्कृती म्हणजे काय व त्याचे भाग सांगितले. मी, तू ,आम्ही, तुम्ही यात संपूर्ण जीवनशैली अडकली आहे. प्रत्येकाला उपभोग, प्राप्ती, मालकी यातून तात्पुरते, क्षणिक सुख मिळत असते. ते दिखाऊ की टिकाऊ हा भेद करता येणारी विवेकबुद्धी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
सुविधा माझ्यासाठी की मी सुविधांसाठी हे ठरविता आले पाहिजे. सर्व गुरु विवेकाचे धनी असतात. दुःखाला आपलं म्हटल्याशिवाय सुख कसं येणार? त्यामुळे दुःखाला नाकारायला नको, त्याला मॅनेज करता यायला पाहिजे. त्यासाठी स्वतःशी संवाद आणि माझ्याकडे काय नाही यापेक्षा माझ्याकडे काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे असेही डॉ.नाडकर्णी यांनी सांगितले. धार्मिक, अध्यात्मिक बैठक असणारे व्यक्ती व अल्पसंतुष्ट व्यक्ती यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. अवलंबन शिकवते ती व्यापारीवृत्ती असते. मी, मी पणाचा अतिरेक म्हणजे संवेदना बोथट होणे असे सांगून रोटरीच्या सदस्यांप्रमाणे मी पासून आपण या भूमिकेकडे आल्यानंतर सुखाचा सदरा व आनंदाचा अनुभव आपल्याला मिळेल असे डॉ.नाडकर्णी यांनी सांगितले. परिचय माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी यांनी केला. अमृत महोत्सवी वर्ष समितीचे प्रमुख डॉ. तुषार फिरके यांनी आभार मानले. प्रारंभी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीत तर समारोप डॉ. नाडकर्णी यांनी त्यांची स्वरचित प्रार्थना सादर करून केला.