पत्नीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या चोपड्याच्या पती-पत्नीवर गुन्हा दाखल!
चोपडा (प्रतिनिधी ) – अडावद येथे एका धक्कादायक घटनेत, पतीनेच आपल्या पत्नीला तिच्या इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले आणि तिच्या कमाईवर आपली उपजीविका चालवली. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी ‘अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम’ अंतर्गत पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असलेले चंद्रकांत सुपडू सोनवणे (वय ४५) आणि त्यांची पत्नी शीला चंद्रकांत सोनवणे (वय ४२) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमके काय घडले?
मूळची येलदरी, जि. हिंगोली येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेला आरोपींनी त्यांच्या धानोरा येथील घरी आणले होते.आरोपी पती-पत्नीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले.आरोपी चंद्रकांत सोनवणे हा पीडितेच्या कमाईवर आपले पोट भरत असल्याचे कारवाईदरम्यान स्पष्ट झाले.
ही माहिती मिळाल्यानंतर, अडावद पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या रघुनाथ मराठे यांनी त्वरीत या घटनेची फिर्याद दाखल केली. सोमवारी, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडावद पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध ‘अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहेत.









