प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी) – नियती कुणीही बदलवू शकत नाही. सूर्योदय आला तिथे सूर्यास्त होणार हे निश्चित असते, संयोग आला तिथे वियोग येतोच. काही गोष्टी ठरविल्या तरी बदलविता येत नाही त्यालाच ‘नियती’ म्हटले जाते, असे प्रतिपादन प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी केले. यशाच्या ५ महत्त्वाच्या गोष्टींवर सप्ताहाच्या प्रारंभीक धर्मसभेत चर्चा करताना महत्त्वाचे घटक क्रमशः सांगण्यात येत आहेत. या श्रृंखलेत शेवटच्या ‘नियती’ या तत्वाबाबत सोदाहरण सांगण्यात आले.
भगवान महावीर यांना गौतम स्वामींनी जे सांगितले त्याबाबत चर्चा ही करण्यात आली. अमृत फळ प्राप्त करायचे असेल तर सम्यकत्वाचा कल्पवृक्ष लावावा लागेल, मिथ्यातत्व समुळ काढून टाकल्या शिवाय सम्यकत्त्वाचे झाड फळणार, फुलणार नाही. हे सांगताना चांगले कर्म करा, पुरुषार्थ करा… यश किंवा अपयश नियतीवर अवलंबून असते. ही बाब स्पष्ट करताना त्यांनी आंब्याच्या झाडाचे उदाहरण दिले. एखादी व्यक्ती आंब्याची कोय जमिनीत टाकून त्याला रुजविते, खत पाणी देऊन मोठे करते परंतु नियतीला वेगळेच मंजुर असते. त्या झाडावर कीड लागून ते कोरडे होते. ज्या झाडापासून छाया मिळाली असती, गोड चविचे आंबे मिळाले असते परंतु नियतीमुळे तसे होऊ शकले नाही. ‘जैन दर्शन’मध्ये नियतीचे (नशीब) अस्तित्व मानले जाते, पण त्याचबरोबर प्रयत्नांना (पुरुषार्थ) देखील तेव्हढेच महत्व दिलेले आहे. जैन धर्मात पाच समवाय (पाच घटक) मिळून उत्तमातील उत्तम ते घडते, यातील एक घटक जरी नसेल तर मात्र अपयश पदरी पडते. या पाच समवायांमध्ये नियतीचाही समावेश असल्याचे श्रमणीसूर्या राजस्थान प्रवर्तिनी प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी आजच्या हृदयस्पर्शी प्रवचनातून केले. कनककुमार यांच्या उत्कंठा वाढविणाऱ्या क्रमशः कथानकाचा पुढील भाग प्रस्तूत केला.
तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या जनकल्याणी वाणीचे श्रवण करून सुबाहूकुमार यांनी गृहस्थधर्माच्या १२ व्रतांचे आचरण करून स्वतःला सुश्रावक बनवले. राजकुमार पौषध शाळेत धर्मचिंतन करताना त्यांच्या मनात विचार येतो की, भगवान महावीर हस्तिशीश नगरीत येतील त्यावेळी मी संयम अर्थात अंगार धर्माचा स्वीकार करेल. प्रभुंच्या मखारविंदातून पहिले प्रवचन ऐकले तर सुश्रावक बनलो परंतु आता मोक्षाचे लक्ष्य गाठायचे आहे, पुढील प्रगतीपथावर चालायचे आहे. मोक्षासाठी सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य असणे अत्यावश्यक आहे. या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत असे सांगून सुबाहूकुमार यांच्या जीवनात घडलेल्या चांगल्या बदलाबाबत प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनाचा समारोप केला.