मुंबई ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर अमरावतीत दंगल भडकवल्याचा आरोप केला आहे. भाजप नेते अनिल बोंडे यांनी दंगलीचा कट रचला होता. दंगल भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे आले होते. भाजप आमदाराने हे पैसे वाटले होते, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की , . भाजपने बंदच्या आडून सुनियोजितपणे दंगली भडकवण्याचं काम केलं. पोलिसांनी हा कट उधळून लावला. राज्यात दंगल भडकवण्याचे भाजपचे षडयंत्र होते. राज्यातील जनतेने संयम राखला. त्यामुळे इतर ठिकाणी दंगली भडकल्या नाही. अमरावती सोडून कुठेच काही घडलं नाही. अमरावतीत कोणत्याही दोन समुदायात दंगल झाली नाही. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी 2 तारखेच्या रात्री दंगलीचं षडयंत्रं रचलं. दारु वाटल्या गेली, पैसे वाटण्यात आले… दंगली भडकावल्या गेल्या. पोलीस चौकशीत माहिती मिळाली आहे. मुंबईतून दंगली भडकवण्यासाठी पैसे गेले. आमदाराच्या माध्यमातून या पैशाचं वाटप करण्यात आलं. त्याचीही चौकशी सुरू आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. सर्व अस्त्र संपल्यानंतर भाजप दंगलीचं राजकारण करत असते. भाजपचे लोक जाणकार आहेत. त्यामुळे ते काहीही करू शकतात, असंही ते म्हणाले.
त्रिपुरातील घटनेनंतर मुस्लिम समाजात नाराजी होती. त्यामुळे मुस्लिम संघटनांनी बंदचं आवाहन केलं होतं. त्याचे पडसाद उमटले होते. पोलिसांनी घटनेला नियंत्रित केलं. ज्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अशा सर्व लोकांविरोधात गुन्हे दाखल करून अटक सुरू केली आहे, असं त्यांनी सांगितलं.
दंगलीप्रकरणी राष्ट्रवादीच्या मालेगावातील नगरसेवकावर गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं जात आहे. ते काही खरं नाही. आमदार मुफ्ती यांनी 2014ची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढली होती. त्यांच्यासोबत आलेल्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढली होती. नंतर काँग्रसेसोबत राष्ट्रवादीची युती झाली. मालेगाव मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने मुफ्ती एमआयएमसोबत गेले. त्यांच्यासोबत इतर नगरसेवकही गेले. कागदपत्रावर ते राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. पण प्रत्यक्षात ते एमआयएममध्ये आहेत. त्यापैकी एका नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तो राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे हे म्हणणं योग्य नाही, असं मलिक म्हणाले.