अमरावती ( वृत्तसंस्था ) – अमरावतीत बंद’मध्ये सहभागी भाजपाच्या १४ नेत्यांना पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून अटक केली. भाजपाचे महापालिकेचे गटनेते तुषार भारती यांना घरुन व माजी आमदार अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनाही पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केलं
हे अटक सत्र सुरु असतानाच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दंगल करणांंऱ्या एकालाही सोडणार नाही, असा थेट इशाराच दिल्याने भाजपा नेत्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.
भाजपाने १३ नोव्हेंबररोजी अमरावती बंदची हाक दिली होती. या बंदला नंतर हिंसक वळण लागलं. त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचाराविरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबररोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील २० ते २२ दुकानात तोडफोड झाली. काही दुकानादारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता या मोर्चा विरोधात भाजपाने दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ नोव्हेंबररोजी अमरावती शहर बंदचे आवाहन केलं. मात्र, या बंद दरम्यान आंदोलकांनी हिंसा केल्याचं पहायला मिळालं.
या अटक सत्राच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत तीन दिवसांपासून तणावपूर्ण शांतता असून काल व आज कुठल्याही प्रकारे गालबोट लागलं नाही अशी माहिती दिलीय. अमरावतीत संचारबंदी असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधासाठी दुपारी दोन ते चार या वेळेला परवानगी देण्यात आली आहे. लवकरात लवकर परिस्थिती सामान्य होईल अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.
अमरावतीमधील चार ते पाच हजार पोलीस वगळता राज्य राखीव दल पोलीस बंदोबस्तसाठी तैनात असल्याचे देखील ठाकूर यांनी सांगितले. १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेल्या हिंसक घटनांनंतर पोलीस आयुक्त संदिप पाटील यांनी शहरात कर्फ्यूचे आदेश दिलेत. आरोग्यविषयक आणीबाणी वगळता नागरिकांना घरााबाहेर पडता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यावरही निर्बंध आहेत.