राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
जामनेर (प्रतिनिधी) : येथील महाविकास आघाडीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार दिलीप बळीराम खोडपे सर यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे यांचे आज जामनेरमध्ये हेलिकॉप्टरने भव्य आगमन झाले आहे. जळगाव रोडवर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले असून, भव्य रोड शोला सुरुवात झाली आहे.
खा. अमोल कोल्हे यांच्या आगमनानंतर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. खा. कोल्हे यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या उधळणीत स्वागत केले गेले. ज्यामुळे संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले आहे. जळगाव रोडवरुन हा रोड शो सुरु असून, जामनेर, पहूर, पाळधी, लोहारा व आसपासच्या गावातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी जमले आहेत. त्यांच्या सहभागामुळे रोड शोला भव्य स्वरूप प्राप्त होत आहे आणि दिलीप खोडपे यांच्या प्रचाराला एक वेगळीच उर्जा मिळत आहे. कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा रोड शो एक ऐतिहासिक क्षण ठरणार असून, जामनेरातील जनताही या रोड शोची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहे.