रस्ता हरवलेल्या ५५ वर्षीय महिला सुखरूप घरी ; सुजाण नागरिक, पोलिसांमुळे नातेवाईकांच्या ताब्यात
अमळनेर (प्रतिनिधी) : अहमदनगर येथून एका ५५ वर्षीय महिलेला बीड जिल्ह्यातील अमळनेर येथे जायचे होते. मात्र नजरचुकीने त्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेरात येऊन अडकल्या. मात्र सजग नागरिकांनी पोलिसांच्या सहकार्याने सदर महिलेचा तपस लावून तिच्या नातलगांची भेट घालून दिली. यावेळी महिलेच्या कुटुंबीयांनी नागरिक व अमळनेर पोलीस स्टेशनचे आभार मानले.
शहरातील पैलाड भागात ५५ वर्षीय महिला गेल्या ३ दिवसांपासून फिरत होती. सदर महिला ही श्रीकृष्ण कॉलनीत सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोहचली असता, तेथील महिला कमलबाई रमेश भोई यांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा सदर महिला या बीड जिल्ह्यतील अमळनेर येथे राहत असल्याचे सांगिले. सदर महिलेकडे संपर्कासाठी कुठलेही साधन नव्हते. सदर बाब ही कमलबाई भोई यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला हेड कॉ.मंगल भोई, योगेश पवार यांना सांगितली. त्यानुसार सादर महिलेचे फोटो काढून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशात व्हायरल करण्यात आले. पोलिसांनी सखोल तपास केला असता, सदर महिला ही बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील अमळनेर भांड्याचे येथील असल्याचे समजले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक विकास देवरे, गणेश पाटील, मंगल भोई, योगेश पवार व विलास पाटील आदी नागरिकांच्या पाठपुराव्याने सदर महिलेचा २ तासातच तपास लागला. सदर महिलेचे नाव पद्मिनी दत्तू पोकळे( वय – ५५ रा.अमळनेर (भां) ता.पाटोदा जिल्हा बीड) असे निष्पन्न झाले. महिला ही अहमदनगर येथे आपल्या भावाकडे जाण्यास निघाली होती. त्यांना घर न सापडल्यामुळे ते परत अमळनेर येथे रवाना झाली असता, जळगांव जिल्ह्यातील अमळनेर येथे पोहचली असल्याचे लक्षात आले.
सदर महिला ही दि.२६ जून २०२४ पासून अहमदनगर येथून बेपत्ता असून, दि.२८ जून २०२४ रोजी अमळनेर (भां) ता.पाटोदा जि.बीड येथे पोलिसांत हरविलेली महिलेची नोंदणी रजिष्टर करण्यात आलेले होती. त्यानुसार पद्मिनी पोकळे या महिलेस घेण्यासाठी त्यांचा मुलगा व नातलग हे अमळनेर येथे घेण्यासाठी आले होते. सदर महिलेस परत घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी माणुसकी या अजून जिवंत आहे. असे म्हणून पोलीस व नागरिकांचे आभार मानले.