अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) – येथील प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुभम विनोद धोत्रे (वय १७, रा. पारोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे. पारोळा येथील वंजारी शिवारालगत रहिवासी असलेले विनोद धोत्रे यांचा चिरंजीव शुभम धोत्रे (वय १७) हा ११ वी मध्ये अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शुभमचे वडील पारोळा येथील फटाका कारखान्यात कामाला आहेत. १६ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाला सुट्टी असल्याने शुभम व त्याचे काही मित्र शहरातील गलवाडे रस्त्यावरील नियोजित साने गुरुजी स्मारकालगतच्या खदानी जवळील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. तेथे पोहत असताना शुभमचा बुडून मृत्यू झाला.
दुपारपासून शुभमचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते, पट्टीचे पोहणाऱ्यांनी प्रयत्न केल्यावरही विहिरीतील शुभमचा मृतदेह हाती लागला नाही. अखेर धुळे येथून एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. रात्री साडेदहा वाजता विहिरीतील गाळात फसलेला मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागला. मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. विच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत अमळनेर पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.