सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे अमिष दाखवत खासगी ठेकेदाराची तब्बल २ कोटी ७२ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दि. २६ जून ते २६ नोव्हेंबर दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर येथील खासगी ठेकेदाराला एका व्हाटस्ॲप ग्रुपमध्ये अजय गर्ग नामक व्यक्तीने ॲड केले. त्यानंतर या ग्रुपमधील रितू वोरा नामक व्यक्तीने लिंक पाठविली. (केसीएन)एका ॲप्लिकेशनद्वारे शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवून देण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार ठेकेदाराने ॲप्लिकेशन डाऊनलोड केले. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफ्याचे अमिष दाखविल्यानंतर या ठेकेदाराने काही रक्कम गुंतविली. त्यावर एक हजार रुपये नफा म्हणून त्यांच्या खात्यावर जमा केला.
त्यातून विश्वास संपादन करीत त्यांना अधिकची रक्कम गुंतविण्यास सांगितली. मात्र नंतर ते रक्कम गुंतवत गेले. मात्र त्यांना कोणताही नफा दिला नाही, की मुद्दलही परत दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अजय गर्ग व रितू वोरा नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.