अमळनेर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने केली अटक
अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरातील प्रताप मिल कंपाउंड येथे भर दुपारी घरासमोर लावलेली दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीवरून अटक करण्यात आली आहे. तसेच अमळनेर पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त केली आहे.
शहरातील राजेंद्र रतनलाल वर्मा (रा. प्रताप मिल कंपाऊंड) हे दि. ३१ जुलै रोजी दुपारी जेवणासाठी घरी आले होते. त्यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची दुचाकी हॅण्डल लॉक करून घरासमोर लावली होती. ती चोरट्याने चोरून नेल्याने अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी अमळनेर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोधपथकातील पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या नेतृत्वात पोलिस कॉन्स्टेबल अशोक साळुंखे, मिलिंद सोनार, विनोद भोई, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, विनोद संदानशिव, उदय बोरसे आदींना चोरटा शोधण्याचे आदेश व सूचना दिल्या होत्या.
पथकाने प्रताप मिल कंपाऊंड परिसर व इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. तसेच गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून विजय भाईदास भील (वय १९, रा. एकरुखी ता.अमळनेर) याने मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला एकरूखी येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याने डुबकी मारुती मंदिर परिसरातील झाडाझुडपांमध्ये चोरीची दुचाकी लपवल्याची कबुली दिली. तेथून ती जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.