अमळनेर तालुक्यातील घटना, आशा वर्करच्या तत्परतेने पतीविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) :- अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत ती पाच महिन्याची गर्भवती राहिल्याने अमळनेर तालुक्यातील भिलाली येथील महिलेच्या पतीविरुद्ध आशा कर्मचारी महिलेच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा मारवड पोलीस स्टेशनला गून्हा दाखल झाला आहे.

धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ येथील आशा वर्कर नलिनी कैलास गवळी या कर्तव्यावर असताना गरोदर मातांची नोंदणी करीत होत्या. त्यावेळी भवानी नगर मध्ये एका इसमाने सांगितले की, माझी मुलगी पाच महिन्यांची गरोदर आहे. तिची नोंदणी करून घ्या. आशा वर्करने तिच्यासह गरोदर महिलांना सिव्हिल हॉस्पिटल, धुळे येथे सर्वोपचार केंद्रात नेले. तिला डॉक्टरांनी तपासले असता ती १६ वर्षाची असल्याचे सांगितले. त्या मुलीला विचारपूस केली असता तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न एक वर्षांपूर्वी भिलाली ता. अमळनेर येथील समाधान कैलास सोनवणे याच्याशी लावून दिल्याचे सांगितले. त्याच्याशी शारीरिक संबंध झाल्याने ती गर्भवती झाल्याचे सांगितले. आशा वर्कर ने मुलीच्या आई वडिलांना घेऊन मोहाडी पोलीस स्टेशन, धुळे येथे पोक्सो कायदा कलम ४, ८ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (१) ,६४ (२)(एल) प्रमाणे समाधान सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शून्यनंबर ने तो अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.









