विश्लेषण : अमळनेर विधानसभा मतदारसंघ
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- अमळनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे, अपक्ष उमेदवार माजी आ. शिरीष चौधरी या तिघांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. तिघही उमेदवार मतदार संघात तुल्यबळ दिसत असून प्रचारामध्ये तिघांची आघाडी चर्चेचा विषय ठरली आहे.
अमळनेर विधानसभा मतदारसंघात मागील पंचवार्षिक ला २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असलेले अनिल भाईदास पाटील यांना ९३ हजार ७५७ मते तर भाजपमध्ये असलेले शिरीष चौधरी यांना ८५ हजार १६३ मते मिळाली होती. या मतदारसंघात ३ लाख ४ हजार २२६ मतदार असून पुरुष १ लाख ५६ हजार २१७, महिला १ लाख ४८ हजार ६ तर ३ तृतीयपंथी मतदार आहेत.
मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्ह्यातील एकमेव उमेदवार अनिल भाईदास पाटील हे प्रभावी लढत देत असून त्यांच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळालेले डॉ.अनिल शिंदे यांच्यासह अपक्ष उमेदवार तथा २०१४ च्या निवडणुकीत विजयी झालेले माजी आ. शिरीष चौधरी हे टक्कर देत आहेत. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला चार वेळा आमदारकीची, भाजपला तीन वेळा तर जनता पार्टीला दोन वेळा संधी मिळाली आहे. २ वेळा अपक्ष निवडून आलेले आहेत. यंदा घटक पक्षातील स्थानिक नेत्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची राहणार आहे.