दुचाकीवरून गांजा घेऊन येणारा तस्कर जेरबंद; २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
अमळनेर ( प्रतिनिधी ) – अंमली पदार्थांच्या विक्रीच्या उद्देशाने दुचाकीवरून गांजा घेऊन येत असलेल्या एका तस्कराला अमळनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल १० किलो ५९० ग्रॅम वजनाचा गांजा आणि दुचाकी जप्त केली आहे.
बोरी नदीच्या पुलाजवळ सापळा
सोमवारी, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. नंदगाव ते अमळनेर रोडवरील बोरी नदीच्या पुलालगत असलेल्या कच्च्या रस्त्यावर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावला होता.
पोलिसांना संशयित आरोपी भोजू सुरेश पवार (वय ३४, राहणार बभळाज, जिल्हा धुळे) हा काळ्या रंगाच्या होंडा कंपनीच्या दुचाकीवरून (एमएच १८, सीडी ७३२६) बेकायदेशीररित्या गांजा घेऊन विक्रीसाठी अमळनेरकडे येत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
२ लाख १० हजारांचा गांजा हस्तगत
तपासणीदरम्यान, आरोपीजवळ असलेल्या बॅगेत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी २ लाख १० हजार रुपये किमतीचा १० किलो ५९० ग्रॅम वजनाचा गांजा आणि गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त केली.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी भोजू पवार विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.









