भुसावळ येथून झाले होते बेपत्ता
अमळनेर (प्रतिनिधी) :- भुसावळ शहरातील गडकरी नगरातील न्यू राम मंदिराजवळ राहणारे प्रौढ इसम गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. गुरुवारी दि. ११ सप्टेंबर रोजी अमळनेर शहराजवळील तापी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

धनंजय दत्तात्रय ढंगे उर्फ बबलू (वय ४८) असे मयत इसमाचे नाव आहे. धनंजय ढेंगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, एक भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. रेल्वे परिसरातील कंटेनर यार्ड येथून धनंजय ढेंगे हे दि. ८ सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झाले होते.(केसीएन)त्यांच्या पत्नीच्या खबरीनंतर ९ सप्टेंबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली होती. त्याच दिवशी तापी नदी पुलावरून कुणीतरी उडी मारल्याची चर्चा अमळनेर शहरात होती.
मात्र नदीपात्रात प्रचंड पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शोध मोहिमेत काहीही निष्पन्न झाले नव्हते. ढेंगे यांचा मित्रपरिवार व नातेवाईक अखंडपणे शोध घेत होते. अखेर दि. ११ सप्टेंबर रोजी अमळनेरजवळील तापी नदीपात्रात मासेमाऱ्यांना एक पुरुषाचा मृतदेह सापडला. त्यांनी अमळनेर पोलिसांना तत्काळ माहिती दिली. त्यानंतर भुसावळ येथून ढेंगे यांचे मित्र तेथे पोहोचले असता मृतदेह धनंजय उर्फ बबलू ढेंगे यांचाच असल्याचे ओळख पटली.









