अमळनेर तालुक्यातील मारवाड येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील मारवड येथील एका किराणा दुकानाला अचानक भीषण आग लागल्याने दुकानातील अंदाजे ८ लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची थरारक घटना आज रविवारी ११ रोजी सकाळी पहाटे उघडकीला आली आहे.
तालुक्यातील मारवड येथील ग्रामपंचायत व्यापारी संकुलात भाडे तत्वावर असलेले राजेंद्र भगवान पाटील उर्फ राजू चोपडेकर यांचे शिव जनरल अँड किराणा दुकान आहे. या दुकानाला आज रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. दुकानात असलेले रोकडसह साहित्य असा जवळपास अंदाजे ८ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आगीत वस्तू खाक झाल्याने व नुकसान झाल्यामुळे दुकान मालक राजेंद्र पाटील व त्यांच्या कुटुंबाने एकच आक्रोश केला. आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मारवाड पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.