घरफोडीसह लोखंड चोरीची पोलीस स्टेशनला नोंद
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून दोन ठिकाणी १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. अमळनेर शहरातील प्रताप मिल कंपाऊंडमधून एका घरातून ६९ हजार रुपयांची रोख रक्कम व जानवे येथून महाविद्यालयीन इमारतीचे ४० हजार रुपयांचे लोखंड चोरून नेल्याची घटना घडली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्ह्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
पहिल्या घटनेत, विजय ब्रिजलाल पाटील (रा. प्रताप मिल कंपाऊंड) यांनी फिर्याद दिली आहे. दि. ९ रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास त्यांना शेजारील नागरीकांनी फोन करून घरफोडीची कल्पना दिली. विजय पाटील यांनी घरी येऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडला होता. कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १५ हजार रुपये रोख, २४ हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या, ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल नाना पवार करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, रामकृष्ण मधुकर पाटील (रा. नवलनगर) यांनी फिर्याद दिली आहे. जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे एम. के. पाटील कला वाणिज्य महाविद्यालयाचे बांधकाम अमळनेर तालुक्यातील जानवे येथे सुरू आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी तेथे पाया भरण्यासाठी कापलेले लोखंड आणि कॉलम उभे केलेले विविध मापाचे ४० हजार रुपयांचे लोखंड अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.