अमळनेर (प्रतिनिधी) : धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणात पाण्याची आवक वाढल्याने ८ हजार ८०० क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पांझरा नदीवरील गावांना सतर्कतेचा धुळे पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील सीमेवरून पांझरा नदी वाहते. तालुक्यातील पांझरा काठावरील मांडळ, मुडी प्र. डांगरी, बोदर्डे, कळंबु, ब्राम्हणे, भिलाली, शहापूर, तांदळी, कपिलेश्वर मंदिराजवळ तापी नदीला पोहचते. तर हेंकळवाडी, तामसवाडी, न्याहळोद आदी दोन्ही काठाचे गावे धुळ्याकडे येतात. यात कंचनपूर, वालखेडा, अजंदे, बेटावद, पढावद, मुडावद गावाजवळ पांझरा नदी तापी नदीला मिळते. तापीला जर जास्त पूर असला तर पांझरेचे पाणी मागे फुगते. यामुळे मोठा जलफुगवटा होतो.
पांझरा नदीचे पात्र रुंदीकरणात खूप मोठे आहे. धुळे शहराच्या खालील भागात अनेक ओढे नाले येऊन मिळतात. त्यामुळे पूरस्थिती वाढते. शनिवारी दि. २४ रोजी दिवसभर व दिवसभर पाऊस सुरू असल्याने ओढे नाले वाहू लागले आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत आहे. अलीकडच्या काळात त्याचे पात्र दिवसेंदिवस विस्तारत असून पांझरा नदीत अनेकवेळा रात्रीच्या वेळी नागरिक पुरात सापडून वाहून जातात. दुपारी विसर्ग वाढवलेले असल्याने अमळनेर तालुक्यातील काठावरील गावांना रात्री हे पाणी पोहचेल. त्यामुळे काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा दिला.
पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याची आवक वाढल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कार्यकारी अभियंता, धुळे मध्यम प्रकल्प विभाग व सहाय्यक अभियंता श्रेणी-१, अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग, अक्कलपाडा यांच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणी वाढण्याची शक्यता आहे. रविवारी दि. २५ रोजी सकाळी १० वाजेपासून विसर्ग ८ हजार ८०० क्यूसेक पर्यंत वाढविण्यात आला आहे. गरज पडल्यास वाढविण्यात येणार असल्याने तरी पांझरा नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, नदीपात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.