नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला असून न्यायालयाने स्पर्धा विरोधी करारप्रकरणी याचिका फेटाळत भारतीय स्पर्धा आयोगाच्या चौकशीला सामोरे जाण्याचे निर्देश अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला दिले.

देशाचे मुख्य न्यायमुर्ती रामन्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. हे खंडपीठ म्हणाले की, ‘तुम्ही मोठी ई-कॉमर्स कंपनी आहात. त्यामुळे तुम्ही स्वच्छेने चौकशीला सामोरे गेला पाहिजे’. स्पर्धाविरोधी पद्धत आचरणात आणल्याबद्दल स्पर्धा आयोगाने दोन्ही कंपन्यांविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीला स्थगिती द्यावी, यासाठी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही कंपन्यानी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या. ब्रिक अँड मोर्टरच्या आरोपानंतर सीसीआयने चौकशीचे आदेश दिले होते.







